मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले : पाटील

0

मुंबई : मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे न्यायचा होता, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले.

पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरम्यान, या विधानाने आता भाजपमधील खदखद समोर येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी बंड केले. तर 10 अपक्षांनी शिंदे यांना साथ दिल्याने 50 आमदारांनी एकत्र येवून भाजपच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण अचानक केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीदाची शपथ घ्यायला लावली. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली. या निर्णयानंतर भाजपमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते.

शनिवारी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्यातील सरकार पडल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आहेत. आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे, असंही पाटील यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.