आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू : देवेंद्र फडणवीस

0

पिंपरी : “सध्याच्या राज्यातील सरकारला महाविकास आघाडी सरकार म्हणायचं की महावसुली सरकार म्हणायचं हा प्रश्न आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरू झाली. याचे श्रेय घ्यायला अनेक लोक येतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही मेट्रो झाली आहे. आम्ही पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केलं आहे. आता हे वॉर्ड बदल वैगेरे करत आहेत. तुम्ही काय करायचं ते करा जनता बघतेय. आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू” असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची सुरूवात फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. शाहूनगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, माजी खासदार अमर साबळे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अमित गोरखे, उमा खापरे, नगरसेवक एकनाथ पवार, सदाशिव खाडे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, योगिता थोरात, राहुल जाधव, कुंदन गायकवाड, तुषार हिंगे, केशव घोळवे, राजू दुर्गे, उत्तम केंदळे, बाबू नायर, माऊली थोरात आदी उपस्थित होते.

एखादं चांगलं काम करा आणि श्रेय घ्या. पण विरोधकांना काम करायचंच नाही आणि श्रेय घ्यायचं आहे. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो. विरोधकांनी निवडलेल्या आंदोलनासाठीच्या जागा चुकल्या. अण्णासाहेब पाटील पुतळा समोर, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने असलेल्या उद्यानासमोर निदर्शने केली. अटलबिहारी वाजपेयी हे वैश्विक नेते होते. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी भारताची बाजू यूएन मध्ये भक्कमपणे मांडली याचा देशाला फायदा झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, सामान्य माणसाला श्वास घ्यायला जागा हवी आहे. ओपन स्पेस पाहिजे. जनता आपले काम बघत आहे. कुणी काळे, पिवळे, निळे कोणतेही झेंडे घेतले तरी काही फरक पडत नाही. ह्यांची दुकानं बंद झाली आहेत हे खरं आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर झालेला विकास लोकांनी बघितला आहे.

महेश लांडगे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या आहेत. मागच्या पाच वर्षात घोषणा द्यायलाही विरोधकांकडे कोणी नव्हतं. असे ओरडणारे पैलवान मी खूप पाहिलेत. जे ओरडते ते चावत नाही अशी एक म्हण आहे. त्यामुळे मी अशा ओरडणाऱ्या पैलवानांना घाबरत नाही. भाजपच्या नगरसेवकांनी लोकांच्या गरजेची, हिताची कामे केली आहेत. जोपर्यंत आपल्यासोबत शहरातील नागरिक आहेत तोपर्यंत अशांना घाबरायचं नाही. काम दाखव आणि मत माग असं नागरिक म्हणणार आहेत, असेही आमदार लांडगे म्हणाले.

एकनाथ पवार म्हणाले, “भाजपने समाविष्ट गावांमध्ये हजार ते दोन हजार कोटींचे बजेट दिले आहे. आंदोलकांची लाज वाटते. यापूर्वी तुमची सत्ता होती. पण विकास केला नाही असे विरोधकांना उद्देशून म्हणत पवार म्हणाले, देहूमधून 100 एमएलडी पाणी आणून देत आहोत. मावळातले शेतकरी पिंपरी चिंचवडकरांना पवना धरणाचे पाणी द्यायला तयार आहेत. अटलबिहारी वाजपेयी उद्यान, विवेकानंद क्रीडांगण, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कमान, श्यामाप्रसाद मुखर्जी क्रीडांगण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार महेश लांडगे चांगले पैलवान आहेत. त्यांना माहिती आहे कुस्ती कशी जिंकायची. आगामी पालिका निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील. राष्ट्रवादीने 500 रुपये देऊन आंदोलनाला माणसे आणली. ‘500 रुपये घे आणि काळा झेंडा हातात धर’ असे म्हणून लोकांना आणलं आहे. मी अशा लोकांचा निषेध करतो माझ्या प्रभागातील तीनही नगरसेवक भाजपचेच येतील, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.