काय दिवस आलेत राजू शेट्टींवर; ज्या पवारांनी….

0

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कृषी कायद्यांसंदर्भात राज्यातील शेतकरी बांधवांच्या भावना महाविकास आघाडीच्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी भेटले. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत अशी तक्रारही शरद पवारांकडे केली आहे. मात्र यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका करत टोला लगावला आहे.

“काय दिवस आलेत राजू शेट्टींवर…ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागतायत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच,” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

“नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही,” असं राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना सांगितलं. त्यावर पवारांनी याविषयी जातीने लक्ष घालून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणू, असं आश्वासन शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलं होतं.

शरद पवारांच्या आश्वासनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी शेट्टी यांना भेटीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकरी संघटनाशी चर्चा करूनच तीनही कृषी कायद्याच्या विरोधातील ठरावाबाबत पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली. राजू शेट्टी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.

“राज्य सरकारने येत्या अधिवेशनात कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारित करणार असल्याचे समजते मात्र राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकरी संघटनाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा व केंद्र सरकारने केलेल्या तीनही कृषी कायद्याच्या विरोधातील ठराव येणाऱ्या विधानसभेत करावे अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली,” असे शेट्टी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.