”शिवसेनेने ब्रिगेडी चेहरा दाखविला, तेव्हा तरी काय केलं?”
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांचा शिवसेनेला सवाल
मुंबई ः ”महाराष्ट्रात ज्वलंत हिंदुत्ववाद्यांनी अजान स्पर्धा भरवायला सुरुवात केली, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी तेढ निर्माण करत ब्रिगेडी चेहरा दाखवला, तेव्हा तरी काय केलं त्यांनी?”, असा प्रश्न अग्रलेखातून शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केल्यानंतर भाजपाचे अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला विचारला आहे.
‘सामना’ अग्रलेखातून मांडलेले मुद्दे
चीनचे पंतप्रधान गुजरातमध्ये झोपळ्यावर बसून ढोकळा खात असतानाच शिवसेनेने चीनपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. आता चीनपासून सावध राहण्याचा इशारा भारताने नेपाळला दिला आहे. नेपाळ हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्याने जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व संपवलं जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय केले? असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. या प्रश्नावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे.
नेपाळचा घास आधीच चिनी ड्रॅगनने गिळला आहे. नेपाळमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे दुसऱ्या देशातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे या सबबीखाली आपण नेपाळचा रंग बदलताना उघड्या डोळ्याने सहन केला. मग आता नेपाळला फुकट सल्ले देण्यात काय फायदा? आज चीन हिंदुस्थानपेक्षा नेपाळच्या जवळ जास्त आहे. चीनने नेपाळला कर्जाच्या ओझ्याखाली दाबले आहे. चीन अब्जावधी रुपयांचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हिमालयन रिजनमध्ये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. लडाखमध्ये चिनी सैन्य आतमध्ये घुसले आहे. तरीही त्यांनी भारतात केलेल्या गुंतवणुकीचे कौतुक करताना मोदी सरकार थकत नव्हते, असेही सामनातून मांडले गेले आहे.