नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासमोर मोठे आव्हान निर्माण केलेले असताना, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ दोन मास्क घालण्याची सूचना करत आहेत. या संकटकाळात डबल मास्किंगसंदर्भात काय करायचे आणि काय करायचे नाही याबद्दलच्या सूचना केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत.
त्या सूचना नेमक्या काय आहेत ते पाहूया,
काय करायचे-
डबल मास्क वापरताना ते सर्जिकल प्रकारातील मास्क असायला हवेत. जर कापडी मास्क असतील तर दुहेरी किंवा तिहेरी थरांचे मास्क वापरावे.
नाकावर मास्क घट्ट स्वरुपात बांधलेले असावेत
मास्क लावतानाच श्वास कोंडला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
कापडी मास्क नियमितपणे धुवावा.
काय करू नये –
एकाच प्रकारचे दोन मास्क घालू नयेत.
सलग दोन दिवसांसाठी तोच मास्क वापरू नये.
एका अभ्यासानुसार घट्टपणे आणि व्यवस्थित घाललेल्या दोन मास्कमुळे सार्स-सीओव्ही-२ आकाराच्या कणांना फिल्टर करण्याची क्षमता दुप्पट होते. त्यामुळे दोन मास्क घातलेल्या व्यक्तीच्या नाक आणि तोंडापर्यत कोरोनाचे विषाणू पोहचण्यास प्रतिबंध होतो आणि कोविड-१९चा संसर्ग होणे टाळता येते.
जेएएमए इंटर्नल मेडिसिनचे संशोधन
जेएएमए इंटर्नल मेडिसिन (journal JAMA Internal Medicine)या मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की फिल्टर करण्याची क्षमता कापडाचे थर वाढवल्याने इतक्या प्रभावीपणे तयार होत नाही, त्याउलट मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर नाक किंवा तोंडाजवळ असलेले गॅप दूर केल्याने कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग टाळण्याची क्षमता वाढते.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन, हॉस्पिटलमधील बेड आणि कोरोनाच्या ईलाजासाठी आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील कोविड-१९ रुग्णांच्या एकूण संख्येने ४ मे ला २ कोटीचा टप्पा पार केला.