मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास दीड ते दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे उपस्थित होते. ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्यात भविष्यात राजकारणात काहीही होऊ शकतं अशाप्रकारे सूचक संकेत बाळा नांदगावकरांनी माध्यमांशी बोलताना दिले.
बाळा नांदगावकर म्हणाले, सरकारमध्ये समावेश असण्याचा आमचा संबंध नाही. आम्ही तशी काही मागणी केली नाही. पण दोघांमध्ये चर्चा झाली असेल तर माहिती नाही. राजकारणात परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो. भविष्यात काय परिस्थिती असेल दोन मित्र एकमेकांच्या पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल काय निर्णय घेतात हे पहावं लागेल. मनसे-भाजप युतीबाबत अनुत्तरीत आहे. सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे भाष्य करु शकत नाही. सध्या राष्ट्रपती निवडणुका आहेत त्यात आमचं एकमत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/fj8cvLjbix
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 15, 2022
भाजपला मदत करण्याची भूमिका मनसेने घेतली. आता त्याबदल्यात काय करायचे हे त्यांच्या पक्षाचं धोरण असेल. कुठल्याही मोबदल्यासाठी राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. आता मनसेला सकारात्मक वातावरण आहे. लोकांमध्ये सगळ्याच पक्षांबद्दल अविश्वास निर्माण होत आहे. आमचा एकला चलो रे नारा आज, उद्याही राहणार आहे. पण भविष्यात नक्की काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही असंही बाळा नांदगावकर म्हणाले.