असे काय घडले की, १०० जणांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली? : अजित पवार

0

मुंबई : ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील अाहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण माहिती द्यायला संबंधित लोक तयार नाहीत. ठाणे जिल्ह्यात व शहरात १०० लोकांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. असे काय घडले की, १०० जणांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी केला.

पवार म्हणाले, खासदार, आमदार यांना संरक्षण दिले याबाबत दुमत नाही. मात्र १०० लोकांना संरक्षण देता, त्यांचा खर्च सरकारच्या तिजोरीवर पडतो. तो खर्च कोट्यवधी रुपयांवर जातो. हे संरक्षण कुणाकुणाला दिले आहे? त्यामध्ये त्यांचे व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे व्यवसाय बदलावे, रीतसर व्यवसाय करा म्हणजे धोका असण्याचे कारण नाही. माझ्याकडे १०० लोकांची यादी आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत त्याबद्दल दुमत नाही. सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात आला तर त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. त्याबद्दलही आक्षेप नाही. पण त्या १०० जणांच्या यादीत निम्म्यावर ज्यांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची अजिबात गरज नाही, फक्त मोठेपणा मिरवण्याकरिता जनतेच्या पैशाच्या जोरावर, सरकारी पैशाच्या जोरावर मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न कशाला करत आहात, असा रोखठोक सवालही अजित पवार यांनी सरकारला केला आहे.

शिंदे गटाच्या आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का, असा सवाल जनतेच्या मनात असून आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिरातीत नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे, त्यात वरील भागात भाजप – शिवसेनेचा उल्लेख केला तर मग भाजपचे मंत्री का नाहीत, असा सवाल करतानाच ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे, त्यातील पाच मंत्र्यांच्या विरोधात माध्यमातून काही ना काही बातम्या सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

पोलिस अधिकारी बागडेची एसीबीकडून चौकशी करावी
ठाणे जिल्ह्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे याने बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्याची एसीबीमार्फत चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी अजित पवार यांनी या वेळी केली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रीतसर तक्रार करणार आहे. एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची एवढी मालमत्ता कशी होऊ शकते? बेहिशेबी मालमत्ता तो कशी काय गोळा करू शकतो, याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही या वेळी अजित पवार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.