‘काय हे…अधिकाऱ्यांकडे नोटाच मिळायला लागतात’

0

मुंबई : म्हाडा प्रश्नपत्रिका पेपर फुटीचा तपास करताना TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा निकालात फेरफार झाल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांच्या तपासात अनेक नवनवी माहिती समोर येत आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे व तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली. यानंतर सुपे यांच्याकडून आतापर्यंत सुमारे 3 कोटी 93 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहे. यावरुन आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या भव्य इमारतीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आपले काही अधिकारी जबाबदारी दिल्यानंतर अतिशय चुकीचे वागतात. त्यामुळे लोकांनाही कळत नाही की यांनी काय हे काय चालवले आहे. अधिकाऱ्यांकडे नोटाच मिळायला लागतात. आपल्याकडे ताजे उदाहरण आहे. कोण कुठले सुपे काही कळायला मार्ग नाही. सभागृहामध्ये आम्ही कालच सांगितले आहे, या प्रकरणात कोणीही असले अथवा त्याचे धागेदोर कितीही वरपर्यंत असले तरी जे कोणी दोषी असतील त्यांना मुलांच्या भवितव्यासोबत खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.

पुढे अजित पवार म्हणाले, ‘पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे. असे पुन्हा घडू नये आणि यात राजकारण आणू नये. CBI ला भरपूर कामं आहेत. आपले पोलीस सक्षमपणे काम करताहेत. याआधी ही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली. सुशांत सिंह प्रकरणात काय झालं, शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आले आहे. उगाच आभास निर्माण करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू,’ असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.