पडळकरांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली लेव्हल काय राहिल ?

0

अहमदनगर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी टिका केली. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्याही महिलेला विचाराल तर सांगतील की चुकीची गोष्ट आहे. एखाद्या मोठ्या नेत्यावर कुणी असं वक्तव्य करत असेल तर एखाद्या युवकाला ते चुकीचं वाटलं असेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी पडळकरांच्या गाडीवरील दगडफेकीबाबत दिलीय.

सोलापुरात त्या युवकाने जे केलं ते चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही. मात्र, त्यामागील विचारही समजून घेणं महत्वाचं आहे. जे भाजप नेते पडळकरांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी सांगावं की जे वक्तव्य पडळकरांनी केलं ते योग्य आहे का? महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभतं का? असा सवालही रोहित पवार यांनी केलाय. पडळकर यांना जी आमदारकी दिली गेलीय ती फक्त पवारांवर टीका करण्यासाठी देण्यात आलीय. पडळकर अशी टीका करतात की त्याचं उत्तरही देता येत नाही. कारण त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली लेव्हल काय राहिल, असा खोचक टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. दोन दगडं एकमेकांवर आदळली तर आगच पेटेल, त्यापेक्षा न बोललेलं बरं, असंही रोहित पवार म्हणाले.

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी खिल्ली उडवली. कोंबड्याला वाटतं मी आरवल्याशिवाय  दिवस उजाडत नाही, असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते, असा घणाघात पडळकरांनी पवारांच्या दिल्ली बैठकीवरुन केला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.