आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना कोणत्या पक्षासाठी अनुकूल; वाचा सविस्तर

0

सविस्तर

पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अनेक मातब्बरांच्या प्रभाग तोडण्यात आले असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे.

महापालिका प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करताना सुरुवातीला गोपनियता पाळण्याचा प्रयत्न केला. आराखडा तयार करण्याचे काम केवळ चार ते पाच दिवसाचे आहे असे सांगणारे महापालिका प्रशासन राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत आराखडा तयार करु शकले नाही. त्यामुळे महापालिकेने मुदतवाढ मागवून घेतली आणि तिथेच ‘माशी शिंकली’ अशी चर्चा आहे.  राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाला प्रभाग रचना अनुकूल केल्याचे बोलले जात होते. प्रशासनाकडून प्रभाग रचनेबाबत कोणताही ‘थांगपत्ता’ लागू दिला जात नव्हता. आजअखेर प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील सत्तेत सहभागात दुसरा क्रमांक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात प्रभाग रचना अनुकूल असल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक मातब्बर नेत्यांचे प्रभाग सेफ केल्याचे दिसून येते. संत तुकारामगर, भोसरी, मासुळकर कॉलनी, संभाजीनगर, शाहूनगर, निगडी प्राधिकरण, दळवीनगर, भोईरनगर, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळेसौदागर, रावेत असे प्रभाग सोईचे केल्याचे दिसून येते. या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर पॅनेल प्रमुख असणार आहेत. म्हणजे त्यांच्यावर पॅनेलमधील तीन नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे. अण्णा बनसोडे, आझम पानसरे, विलास लांडे, संजोग वाघेरे, राजू मिसाळ, योगेश बहल, मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, नाना काटे, डब्बू आसवाणी, वैशाली घोडेकर हे सेफ झोनमध्ये आहेत. तर, राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले भाजपचे रवि लांडगे हेही सेफ झोनमध्ये असल्याचे दिसून येते.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अनेकांच्या प्रभागांची लचकेतोड झाली आहे. त्यामुळे अनेक मात्तबर अडचणीत आले आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे. काही ठिकाणी अनेक विद्यमान नगरसेवक आमने-सामने येतील अशी परिस्थिती आहे. सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, विलास मडिगेरी, सीमा सावळे, आशा शेंडगे, सचिन चिंचवडे, राजेंद्र लांडगे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे, तुषार हिंगे, अनुराधा गोरखे, केशव घोळवे, संदीप कस्पटे यांचा कस लागणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मनसेचे सचिन चिखले यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

थेरगाव, ताथवडे, यमुनानगर, मोशी-बो-हाडेवाडी असे काही प्रभाग शिवसेनेसाठी सोईचे झाले आहेत. त्यामुळे शहरप्रमुख सचिन भोसले, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर युवा सेना प्रमुख विश्वजीत बारणे, रेखा दर्शिले, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट सेफझोन मध्ये आहेत. तर, राज्यातील सत्तेत तिस-या क्रमांक असलेल्या काँग्रेसची मात्र फरफट झाली आहे. शहराध्यक्ष कैलास कदम यांचाही प्रभाग सेफझोनमध्ये राहिला नाही. एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनीपर्यंत त्यांचा प्रभाग असणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना भाजपासाठी अनुकूलच आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे पूर्वीपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील. तसेच, तीन-चार ठिकाणी प्रभाग रचनेबाबत कायदेशीर हरकती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असा दावा  भाजपाच्या आजी-माजी शहराध्यक्षांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.