‘व्हाईट कॉलर’ जुगार अड्डा; नगरसेवक, माजी नगरसेवकाचे पती, देवस्थान पदाधिकारी, व्यापारी यांच्यासह 26 जणांवर कारवाई

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत सुरु असलेल्या ‘व्हाईट कॉलर’ जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला. यामध्ये नगरसेवक, माजी नगरसेवकाचे पती, देवस्थान पदाधिकारी आणि व्यापारी यांच्यासह 26 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. दरोडा विरोधी पथकाने कारवाई करुन तब्बल 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री उशीरा करण्यात आली.

यामध्ये पोलिसांनी देवस्थानचे विशाल मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे, देहूतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर चिंतामण टिळेकर, नगरसेविकेचा पती विशाल प्रतापसिंह परदेशी यांचासह शेखर गुलाब परंदवड (50 रा. देहुगाव) व इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुगाव ते येलवाडी रोडच्या उजव्या बाजूस एस.एच. ई. पी.एल हेव्ही इंडस्ट्रीयल फ्यब्रिक्रेशन लिमिटेड कंपनीच्या दुसर्‍या मजल्यावर एकूण 20 ते 25 जण टेबलावर तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 26 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी पाच लाख 33 हजार 270 रुपये , 2 कार 18 दुचाकी व 27 मोबाईल व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 35 लाख दहा हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले व पोलिस उप-निरीक्षक मंगेश भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कांबळे, बनकर, माने, कोकणे, कौशल यांनी केली आहे.

जुगार अड्ड्याची एकच चर्चा
पिंपरी चिंचवड शहरातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलीस आयुक्त वारंवार सर्व अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेऊन सूचना करत आहेत. तसेच अनेकांवर कारवाई करत आहेत. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालू कसा राहू शकतो याचीच चर्चा जोरात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.