मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना तब्बल शंभर दिवसानंतर आर्थर रोड कारागृहाबाहेर आले आहेत. त्यांना आज (ता.९ नोव्हेंबर) ईडीच्या पीएमएलए कोर्टातून त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा कारागृहाबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ईडीने विरोध करत हायकोर्टात अपील केलं होतं त्यामुळे यावर आज पुन्हा दुपारी हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी ईडीने राऊतांच्या जामिनास स्थगितीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळत त्यांच्या जामिनाच्या स्थगितीस नकार दिला आहे. यामुळे राऊतांचा आज घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
कारागृह प्रशासनाने कागदपत्राची औपचारीकता पुर्ण करत संजय राऊतांना कारागृहाबाहेर सोडले. यावेळी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येंनी गर्दी करत मोठा जल्लोष केला आणि फटाक्यांची आतषबाजी करत कोण आला रे..कोण आला..शिवसेनेचा वाघ आला..,अशा घोषणांनी कारागृह परिसर दणाणला आहे. संजय राऊत यांच्यासोबत यावेळी त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत आहेत. यावेळी राऊतांनी शिवसैनिकांना हात उंचावून अभिवादन करत विययी मुद्रा दाखवली. यावेळी शिवसैनिक कमालीचे भावूक झाले होते.