मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता न्यायालयापर्यंत पोहचला आहे. शिंदे गटाने तर शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावून आमचीच खरी शिवसेना असा दावा केल्याने शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद आता आणखी वाढणार आहे, कारण हा वाद आता न्यायालयात गेला आहे. परंतु शिंदे गट आणि शिवसेना यांचे पुन्हा मनोमिलन होऊ शकते का, या शक्यतेबाबत एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
तुम्ही म्हणता की तुमचीच शिवसेना खरी, तर उद्धव ठाकरे म्हणत आहेत की ते शिवसेना पक्षप्रमुख आहेत. तुमच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत ?, असा प्रश्न शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, त्यावर असे आमचे काहीच म्हणणे नाही. लोकशाहीत बहुमताला मान असतो. ते आमच्याकडे आहे.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर तुम्ही जाल का ?, या प्रश्नावर शिंदे म्हणाले, ज्या पद्धतीने ते आमच्यावर आरोप करत आहेत, आमच्यावर टीका करत आहेत, आम्हाला गटनेते पदावरून काढून टाकले आहे, आमचे पुतळे जाळत आहेत. मला नाही वाटत त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत.
बाळासाहेबांचे उदाहरण देताना शिंदे म्हणाले, बाळासाहेब म्हणाले होते की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेन. उद्धव ठाकरे जळगावच्या सभेत म्हणाले होते की, आघाडी सरकारमुळे राज्याची 15 वर्षे सडली. मग अशावेळी आम्ही किती दिवस तुमच्याबरोबर बसणार होतो, असा सवाल शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला केला.