राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची लागणार वर्णी?
वाचा सविस्तर...कोण आहे रेस मध्ये, कोणाचे आहे पारडे जड
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांच्या जागी वर्णी लागावी यासाठी रेस सुरु झाली आहे. यामध्ये पोलीस महासंचालक, होमगार्ड संजय पांडे, पोलीस महासंचालक, विधी आणि तंत्रज्ञान हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, तुरुंग विभाग सुरेंद्र कुमार पांडे, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रजनीश सेठ यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र यामध्ये हेमंत नगराळे यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता जास्त वर्तविण्यात येत आहे.
1987 च्या बॅचचे नगराळे हे आयपीएस अधिकारी आहेत. सुबोध जैस्वाल यांच्या बदलीनंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. जैस्वाल यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार आधी संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. परंतु पांडे जून 2021 मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या स्थानी असलेल्या हेमंत नगराळेंची वर्णी निश्चित मानली जात आहे.
नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक सुबोध जैस्वालकेंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा होती. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुबोधकुमार जैस्वाल यांची आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.