कोल्हापूर : ”ते म्हणतात की, आम्ही या करता काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो की, पंचवीस वर्षे युतीत सडलो होतो.” पण मी म्हणतो की, ज्यांच्यासोबत ते गेले अडीच वर्षातच ते संपले. असंगाशी संग केला तर काय होते हे दिसले. ज्यांच्यासोबत ते गेले त्यांनी त्यांना संपवलं आणि अक्षरशः रस्त्यावर आणून ठेवलं. असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.
अमित शहांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथून भाजपचे महाविजय अभियान सुरू झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले नेते अमित शहा आले तर त्यांना तसे सोडू नका. जे मागायचे ते मागायलाच पाहीजे. हे असे नेते आहेत की, ते न मागता देण्याचे काम अमित शहांनी या ठिकाणी केले. आमच्या साखर कारखान्याचा इनकम टॅक्स त्यांनी कमी केले. प्रत्येक गोष्टीत अमित शहांचा पुढाकार होता. साखर उद्योग जगला तरला याला अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद द्यायला हवे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वाभीमानाने कसे जगावे हे छत्रपती शिवरायांनी शिकवले. त्यांच्यामुळेच आपला स्वाभीमान जागृत आहे. लोकसभेला 2019 ला आम्ही प्रचाराची सुरुवात याच कोल्हापुरातूुन केली होती. भाजप आणि शिवसेना युतीच्या प्रचार करुन 42 जागा निवडून आणल्या. विधानसभेत विजय प्राप्त झाला पण दुर्देवाने संबंधापेक्षा खूर्ची महत्वाची ठरली व काही लोकांनी पंचवीस वर्षांची युती तोडली आणि विरोधकांशी संसार थाटला.
उद्धव ठाकरेंचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”ते म्हणतात की, आम्ही या करता काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो की, पंचवीस वर्षे युतीत सडलो होतो.” पण मी म्हणतो की, ज्यांच्यासोबत ते गेले अडीच वर्षात ते संपले. असंगाशी संग केला तर काय होते हे दिसले. ज्यांच्यासोबत ते गेले त्यांनी त्यांना संपवलं आणि अक्षरशः रस्त्यावर आणून ठेवलं. शिवसेना हा विचार आहे. शिवसेना ही प्रापर्टी नाही. कुणाचे घर आणि मालमत्ता वारसाने मिळू शकते पण विचार जगावा लागतो. ते काम एकनाथ शिंदेंनी केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, धनुष्यबाण काॅंग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण होता. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या साथीने लढाई करून बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा परत शिवसेनेकडे आणला. विचारांच्या शिवसेनेकडे आणला. मला विश्वास आहे की, कोल्हापुरातून चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय अभियान जे सुरू केले त्यामुळे विजय निश्चितच मिळणार आहे.