मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकारणात मागील काही दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण एकनाथ शिंदे गट शिवसेना आमची असल्याचे म्हणत आहे. तर आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे आमची खरी शिवसेना असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना महत्वाचे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात शिवसेनेच्या मालकीवरुन सुरु असलेला वादावर केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच फैसला घेणार आहे. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ आणि संसदेत (आपल्याकडे बहुमत आसल्याचा दावा करत संपूर्ण शिवसेना पक्षावरच आपला दावा सांगितला होता. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती. तर दुसरीकडे शिवसेनकडूनही निवडणूक आयोगाकडे याबाबत कॅव्हेट दाखल केले होते.
त्यानंतर निवडणूक आयोग ॲक्टिव्ह झाला असून शिवसेना नेमकी कुणाची याचा सोक्षमोक्ष लावला जाणार आहे.
त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आयोगाने 8 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणावर सुनावणी करणार असल्याचे समजते. निवडणूक आयोगाचा कौल काय असणार, यावर उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागणार आहे.