मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज (ता. 14 फेब्रुवारी) पासून सर्वोच्च न्यायालयात रोज सुनावणी होणार आहे. तूर्त पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्यास निकाल येण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल असे तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे काय निर्देश असतील. पुढे काय होणार, शिंदे सरकारचे भवितव्य काय असेल. याकडे शिवसेनेच्या दोन्ही गटासह संपूर्ण देशाच लक्ष लागले आहे. शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. या घटनापीठात न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.एस.नरसिंमा यांचा समावेश आहे.
सत्तासंघर्षप्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटामार्फत 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण द्यावे, अशी मागणी मागील सुनावणीत करण्यात आली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात 20 जून 2022 रोजी दाखल करण्यात आले आहे.