नागपूर : माझ्यावर सगळ्यांचे एवढे का प्रेम उतु चालले आहे? असा खोचक सवाल विरोधीपक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. अजित पवारांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते नागपूरमध्ये दाखल होत आहेत. अजित पवारही नुकतेच नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, माझ्यावर सगळ्यांच एवढे का प्रेम उतु चालले आहे? याआधी उद्य सामंत बोलले, दादा भुसे बोलले, त्यानंतर गुलाबराव पाटील बोलले. या सगळ्यांचे माझ्यावर प्रेम का उतु चालले आहे हे कळत नाही. आज महाविकास आघाडीची सभा आम्ही घेत आहोत. मी याठिकाणी येणार का, येणार तर भाषण करणार का, कुठे बसणार याबाबत चर्चांना उत आला होता.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात 6 ते 7 सभा घेण्याचा निर्णय आधीच झाला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाली. त्यानंतर आता नागपूर, मुंबई, नाशिक याठिकाणी सभा होणार आहे. त्याचवेळी असे ठरले होते की प्रत्येक सभेत तिन्ही पक्षाचे दोन-दोन नेते भाषण करतील. मीडीया इतक्या बातम्या चालवतात. मात्र माहिती घेऊन बातम्या चालवत जा.
अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात बोलले. आमच्यातून मी, धनंजय मुंडे बोललो, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे बोलले. त्यामुळे इथे आमच्यातर्फे अनिल देशमुख, जयंत पाटील भाषण करतील. काँग्रेसचे नाना पटोले, सुनिल केदार भाषण करतील. असे वाटते. श्रोत्यांना, जनतेला फार वेळ थांबावे लागू नये. सभा आटोपशीर व्हावी यासाठी 2-2 लोक बोलणार असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याची महाविकास आघाडी म्हणून आम्ही सभा घेत आहेत.
अमित शहांच्या भेटीवर अजित पवार म्हणाले, कुठे चालले, केव्हा भेट झाली. अमित शहा उतरल्यापासून तुम्ही त्यांच्यामागे आहात. बिनबुडाच्या बातम्या आहेत. यात तथ्य नाही. गैरसमज पसरवण्याचे काम करु नका. तुम्ही चर्चा करता त्याचा मी आनंद घेतो. अशा भेटी लपुन राहत नाही.
अजित पवार पुढे म्हणाले, आता अपक्ष धरुन भाजपकडे 115 आमदार आहेत. 40 आमदार आणि 115 मिळून 155 झाले. आणि इतर 10 आहेत. म्हणजे 165, त्यामुळे 16 कमी झाले तरी आकडा 149 राहतो. बहुमताचा आकडा 145 आहे. 16 आमदार अपात्र झाले तरी त्यांच्याकडे 145 आमदार राहतील, ही वस्तुस्थिती आहे. कारण नसताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.