नागपूर : रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट शासनाने घाईगडबडीत उच्च न्यायालयाला पाठवला. यात सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाल्याचे सांगत विरोधकांनी आज सभात्याग केला. यावरून विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येत घोषणाबाजीही केली.
अध्यक्ष सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आमचा समज झाला आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात सभात्याग करण्यात आला.
उच्च न्यायालयाने इतकी घाई का, अशी विचारणा केली. शुक्ला यांनी माझा फोन टॅप केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. नियमानुसार ५७ ची सूचना एक तास आधी देणे आवश्यक असताना नाना पटोले यांनी ती उशिरा दिली. त्यामुळे आपण सूचना नाकारल्याचे सांगत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्यावर नाना पटोले यांच्यासह सदस्यांनी वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. सभागृह नियमानुसारच चालेल, असे अध्यक्षांनी ठणकावून सांगितले.
नाना पटोले यांनी माझा फोन टॅप करून व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा आरोप केला. त्यावर अध्यक्ष प्रश्नोत्तरे घेण्यावर ठाम होते. त्यामुळे विरोधी बाकावरील सदस्यांनी वेलमध्ये येत परत “नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’ अशी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला.
दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फोन टॅप करून विधिमंडळ सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आल्याचे सांगितले. अलीकडे अशा घटना सातत्याने घडत आहे, हे लक्षात घेता सदस्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी पवार यांनी केली.
रश्मी शुक्ला यांना सरकार पाठीशी का घालीत आहे, असा प्रश्न पवार यांनी केला. महत्त्वाच्या विषयावर चर्चा घेण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे, असे पवार यांनी लक्षात आणून दिले. त्या नंतरही अध्यक्ष प्रश्नोत्तराचा तास घेण्यावर ठाम असल्याने विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. यावेळी भास्कर जाधव आक्रमक झाले होते.