ओबीसीवर अन्याय होत असल्यास लढा देणार : भुजबळ

0

मुंबई : मराठा समाजातील काही नेते ‘आम्हाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण द्यावे’, अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे आमच्या आरक्षणावर गदा येत असेल, तर आम्हाला लढावेच लागेल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी शनिवारी दिला.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भुजबळ यांच्या हस्ते डॉ. तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, प्रा. हरी नरके, राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू एकनाथ खेडेकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, कमल ढोले-पाटील, आरती कोंढरे, मनीषा लडकत, योगेश ससाणे, गौतम बेंगाळे, रवी चौधरी या वेळी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यांसाठी शासनाशी संघर्ष करावा लागत आहे. ‘बार्टी’, ‘सारथी’ प्रमाणेच ‘महाज्योती’ संस्थेसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. ओबीसी समाजासाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्य़ात ओबीसी समाजातील मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी करावी. नोकऱ्यांमधील अनुशेष दूर करून ओबीसींच्या आर्थिक मदतीसाठी आधार योजना सुरू करण्यात यावी. मंत्रालयातील झारीतले शुक्राचार्य ओबीसी आरक्षणामध्ये अडचणी आणत आहेत. भारतरत्न मिळाले नाही म्हणून महात्मा फुले यांचे मोठेपण कमी होत नाही, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.