नागपूर : विधानसभा आणि विधानपरिषदेत आज नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा मुद्दा गाजला. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
विरोधकांकडून शिंदेवर होणाऱ्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर न्यास प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे तुमच्या सारखं साडे तीनशे कोटी फुकट देत नाही. तसेच धन दांडग्यांना पैसे देत नसल्याचे म्हटले आहे. आपण नगरविकास मंत्री असताना हे झालं असून, नव्याने वाटप केलेले नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे कधीही खोटं काम करणार नाही असेही ते म्हणाले.
ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांच्याकडे या प्रकरणाची पूर्ण माहिती नसल्याचेही शिंदे म्हणाले. आम्ही तुमच्या सारखे नसून बिल्डरकडून 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.