थंड पडलेल्या गुन्हे शाखा ‘ऍक्टिव्ह’ होणार का ?

गुटखा, पान मसाला याची शहरात सर्रास विक्री

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर प्रत्येक पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयाचे कामकाज पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. याच दरम्यान पोलीस ठाण्यासोबत गुन्हे शाखेचीही पथके निर्माण झाली.

शहरात पाच गुन्हे युनिट, खंडणी, दरोडा, सामाजिक सुरक्षा, आमली पदार्थ विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक, शस्त्र विरोधी पथक यासोबत प्रॉपर्टी सेल, परवाना विभाग आणि वेगवेगळे सेल, विभाग स्थापन झाले. शहरातील गुन्हेगारी आणि अवैद्य धंद्यावर लगाम बसावा या हेतूने ही पथके सुरु करण्यात आली. शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी धंदे सुरूच राहिल्याचे कारवाया वरुन दिसुन आले.

गुन्हे शाखेच्या एक दोन पथके वगळता सर्वच पथके गेली वर्षभर थंड पडलेली पाहायला मिळाली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्वात पहिले स्थापन केलेले सामाजिक सुरक्षा, युनिट चार आणि गुंडा विरोधी पथक सोडता इतरांची कामगिरी फारशी पाहायला मिळाली नाही. सामाजिक सुरक्षा विभागाने शहरातील बेकायदेशीर गुटखा, दारु, वेश्या व्यवसाय, स्पा, मटका, बेटिंग आदी अवैध धंद्यावर कारवाई केली. त्याच बरोबरीने फरार आणि पाहिजे असणाऱ्या गुंडांना अटक करुन आयुक्तालयातील गुन्हेगारांवर खाकी वचक निर्माण करण्याचे काम गुंडा विरोधी पथकाने केले.

ज्या कारणांसाठी स्थापन केलेली गुन्हे शाखेची पथके स्वतःचे काम करत नसताना पाहायला मिळाले. आमली पदार्थ, गांजा तसेच अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात दिसली. ज्या पथकाचे काम आहे त्यांनी न केल्याने दुसऱ्याच पथकाने  कारवाई करुन लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला.

चाकणच्या म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री आणि साठवणूक केली जाते. या परिसरात झालेल्या कारवायांवरुन हे स्पष्ट झाले आहे. तसेच इतर परिसरातही गुटख्याच्या मोठ्या कारवाया झालेल्या आहेत. या ठिकाणी अवैध गुटखा साठवणूक आणि विक्री जोरात होते. मात्र या ठिकाणी दुसऱ्याच पथकाने कारवाई केली. या परिसरातील ‘गुटखा किंग’वर कारवाई करुन त्यांना आरोपी करण्यात आले. मात्र आजही यातील मोठे धेंडे मोकाट आहेत.

दरम्यान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी अंकुश शिंदे नवीन पोलीस आयुक्त रुजू झाले. पहिल्याच दिवशी त्यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त करुन इतर गुन्हे शाखांना संदेश दिला. यानंतर सर्वच गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी खडबडून जागे झाले आणि कारवाईला सुरुवात झाली.

चार दिवसांपूर्वी निगडी ओटास्कीम परिसरात गांजाची मोठी कारवाई करण्यात आली. मात्र आजही याच परिसरात किंवा इतर ठिकाणी गांजा, अवैध गुटखा विक्री जोरात सुरु आहे. औद्योगिक क्षेत्रातुन संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा पुरवला जातो. यावर संबंधित गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुन्हे शाखेची पथके कारवाई करणार नसतील ‘त्या’ पथकांचा उपयोग काय ? असा प्रश्न खुद्द पोलीस खात्यातच निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.