सत्तेमधील ‘चोरमंडळ’ नपुसंक शेऱ्यावर हक्कभंग घेणार का ?

0

 

मुंबई : धर्म ही अफूची गोळी आहे व ती बंदुकीच्या गोळीपेक्षा घातक आहे. धर्मात राजकारण करून सत्ता मिळवणे व त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारच्या वर्मावरच घाव घातला. आता सर्वोच्च न्यायालयाने अवमान केला म्हणून सत्तेतले चोर मंडळ’ नपुंसक शेऱ्यावरही हक्कभंग आणणार काय? असा सवाल आजच्या सामनातून ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

सामनात म्हटले आहे, महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून राज्यात धार्मिक तेढ विकोपाला जात असल्याचे आसूड देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण महाराष्ट्रातील सत्तेत कोणी शहाणेच राहिलेले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या डोक्यात हातोडा मारूनही त्यांचे डोके ठिकाणावर आलेले नाही.

सामनात म्हटले आहे, महाराष्ट्रात एकाच दिवशी मंत्रालयाच्या दारात तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात धुळयाच्या शीतल गाडेकर यांचा मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांनी मंत्रालयाच्या दारात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री किंवा त्यांच्या सरकारच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. तिघांचीही वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक झाली, लुबाडणूक झाली असे त्यांचे म्हणणे आहे व त्यामुळेच आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. पण जे सरकार फसवणुकीतून निर्माण झाले ते लोकांच्या फसवणुकीवर काय उतारा देणार?

सामनात म्हटले आहे, छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होत आहे व त्याआधीच धार्मिक तेढ निर्माण करून दंगा करण्याचा प्रकार घडला. छत्रपती संभाजीनगरात आजही तणावाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात ऊठसूट ‘लव्ह जिहाद’च्या नावावर हिंदू आक्रोश मोर्चे काढून तेढ निर्माण होईल, अशी भाषणे केली जात आहेत. जनतेचे प्रश्न सोडवता येत नसल्याने धर्माचे राजकारण करून पोळया भाजायच्या हेच सध्याच्या मिधे सरकारचे धोरण आहे.

सामनात म्हटले आहे, आता हिंदुत्वाच्या नावावर ‘सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. ज्या मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या बेइमान गटाने सावरकर साहित्याची चार पाने कधी चाळली नाहीत ते सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढीत आहेत. सावरकर गौरव यात्रा काढायची तर काढा, पण त्याआधी सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन गौरव तरी करा. ‘भारतरत्न’ हीच सावरकरांची गौरव यात्रा ठरेल, पण दिल्लीचे सरकार त्यावर गप्पच आहे.

सामनात म्हटले आहे, वीर सावरकरांना दाढी’चा अत्यंत तिरस्कार होता. त्याबाबतीत त्यांनी तुर्कस्तानच्या केमाल पाशाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे सावरकरांना मान्य नसलेल्या दाढीला मुख्यमंत्री गुळगुळीत कात्री लावतील काय? दाढी वाढवणे वगैरे प्रकार, शेंडी- जानवे, गाईस गोमातेचा दर्जा देणे वगैरे कर्मकांडे वीर सावरकरांना मान्य नव्हती. मंत्र-तंत्र, जादूटोणा, रेडाबळी वगैरे प्रथांना त्याचा विरोध होता. गौरव यात्रा काढणाऱ्यांनी सावरकरांच्या या विचारांचा प्रसारही करायला हवा.

सामनात म्हटले आहे, ज्ञान हे तपस्या व अनुभवातून मिळते, खोक्यांतून मिळत नाही व धर्माध विचारांच्या कचऱयातून तर ते अजिबात प्राप्त होत नाही. धर्म आणि राजकारण जेव्हा भिन्न होतील आणि राजकारणी धर्माचा वापर राजकारणासाठी करणे थांबवतील तेव्हा हेट स्पीच’ म्हणजे द्वेषमूलक भाषणेदेखील थांबतील, पण मुसलमानांकडे बोट दाखवून ‘गोली मारो साले को’ अशा चिथावण्या देणारे लोक केंद्रात मंत्री म्हणून बसले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.