हिवाळी अधिवेशन : तीन दिवसांच्या विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार लांडगेंचे तीन मुद्दे!
राष्ट्रपुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा समावेश करा
पिंपरी : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडशी संबंधित तीन मुद्दे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी विधीमंडळात मांडण्यासाठी संबंधित मंत्र्यासमोर ठेवले आहेत. अवघे तीनच दिवस अधिवेशन होणार असल्यामुळे याबाबत निर्णय होईल की नाही? याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत हिवाळी अधिवेशनाचे कामकाज बुधवारी सुरू झाले. त्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे विधीमंडळात उपस्थित राहिले आहेत.
पुणे पिंपरी-चिंचवड रेसिडेन्सिअल कॉरीडोर ते पुणे इंडस्ट्रीअल कॉरीडोर वाहतूक व्यवस्थेच्या नियोजन तसेच आराखडा तयार करणे कामी व अंमलबजावणी साठी पूर्ण वेळ उच्चपदस्थ सनदी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामधील भोसरी मतदारसंघातील विद्युत विषयक कामाकरिता भरीव निधी मिळावा तसेच प्रलंबित कामे मार्गी लावण्याबाबत उर्जामंत्री नितीन राउत यांना मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम महाराष्ट्रासह अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी हौताम्य पत्करले आहे. त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचा समावेश राष्ट्रपुरूषांच्या यादीत करावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार लांडगे यांनी केली आहे.