नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षात सिघेला पोहचले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता सर्वोच्च न्यायालयाची एन्ट्री झाली आहे. शिवसेनेत दुफळी निर्माण करत वेगळ्या झालेल्या एकनाथ शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात 2 याचिका दाखल केल्या.
सदर याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे. 16 आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिशीविरोधात भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली आहे.
गटनेता म्हणून अजय चौधरींच्या नियुक्तीला मान्यता देण्याच्या नरहरी झिरवळांच्या निर्णयाविरोधात स्वतः शिंदे यांनी याचिका दाखल केलीये. सुप्रीम कोर्टाने तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती मान्य केली असून यावर दोन्ही याचिकांवर आज एकाच वेळी सुनावणी होईल.
शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? याबाबत आता जोरदार चर्चा सुरू आहेत.