हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या महिलेस अटक

0
पुणे: हातात कोयता घेऊन, घरात घुसून, दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीच्या प्रमुख असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

रिना उर्फ हिना तायडे (२४, रा. महादेववाडी, खडकी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या दोन साथीदारांवर ‘आर्म अ‍ॅक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित प्रकाश काची (३६) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काची हे खडकी परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करतात. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते नातेवाइकांकडे चारचाकीतून निघाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात गाडी आली असता, हिना व तिच्या साथीदारांनी त्यांना अडविले.

त्यानंतर एका मुलाने शर्टमध्ये लपविलेला कोयता काढून ‘तू आम्हाला ओळखत नाही का? आमच्यासोबत हिना दीदी आहे. ती आमच्या गँगची लीडर आहे. तिच्या परवानगीशिवाय वस्तीत गाडी आणायची नाही. महादेववाडी हिना दीदीच्या मालकीची आहे. परत गाडी आणलीस, तर खल्लास करून टाकीन,’ अशी धमकी दिली. त्या वेळी घाबरून काची हे आरोपींना ढकलून तिथून निघून गेले.

त्यानंतर आरोपींनी रात्री काची राहत असलेल्या परिसरात जाऊन आरडाओरडा केला. तक्रारदार यांच्या दरवाज्यावर कोयत्याने वार केले. तसेच परिसरातील लोकांना ‘आमचे ऐकत नसाल, तर एकेकाला खल्लास करू’ अशी धमकी देऊन शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तपास खडकी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.