न्यायालयातील एका तक्रारीच्या केसचा निकाल पक्षकाराचे बाजूने लावण्यासाठी कोर्ट मॅनेज करुन देण्याचे बहाण्याने एका खाजगी महिलेने अडीच लाख रुपयांची लाच स्विकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय-29,रा.तळेगाव दाभाडे, ता.मावळ, पुणे) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने (एसीबी) पैसे स्विकारताना रंगेहाथ अटक केली आहे.
याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदारची केस वडगाव मावळ न्यायालयात प्रलंबित आहे. सदर केसचा निकाल तक्रारदारचे बाजूने लावण्याकरिता काेर्ट मॅनेज करुन देते असे शुभावरी गायकवाड हिने सांगितले. त्याकरिता तिने अडिच लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार याने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सहाय्यक पाेलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांचे पथकाने सापळा रचून संबंधित महिलेचे पैसे स्विकारताना जेरबंद केले. तिच्यावर याप्रकरणी देहूराेड पाेलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7अ, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पाेलीस आयुक्त सीमा मेहेंदळे याबाबत पुढील तपास करत आहेत.