मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळ दोन शिफ्ट्समध्ये राबवता येईल का, वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यावेळी ते बोलत होते. १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृती सुरु करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, मंत्रालयअधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची उपस्थिती होती.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.