इंद्रायणीनगरमधील पाण्याच्या टाकीचे काम उपमुख्यमंत्री अजितदादांमुळेच रखडले!
महापालिका पाणी पुरवठा विभागाचा खुलासा
पिंपरी : इंद्रायणीनगर येथील सेक्टर क्रमांक-१ मधील प्लॉट क्रमांक ४ वर प्रस्तावित असलेल्या पाण्याच्या उंच टाकीचे काम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसारच बंद करण्यात आले आहे, असा धक्कादाखक खुलासा महापालिका पाणी पुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकीवरुन राजकीय कुरघोडी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
इंद्रायणीनगर येथे नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १ प्लॉट क्रमांक ४ येथे १९३३.०३ या मोकळ्या जागेवर पाण्याची टाकी (जलकुंभ) उभारण्याचा प्रस्ताव क- प्रभाग समितीमध्ये दि. ५ नाव्हेंबर २०१८ रोजी (ठराव क्रमांक ३८) मंजुर केला आहे. महापालिका प्रशासनाने त्याचे कार्यादेशही केला आहे. काम सुरू झाल्यानंतर राजकीय दबावातून काम अर्धवटस्थितीत थांबवण्यात आले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाला खुलासा करण्याचे पत्र दि. ३ जून २०२१ रोजी दिले होते. त्यानंतर दि. १६ जून २०२१ रोजी प्रशासनाने उत्तर दिले आहे.
प्रशासनाने दिलेल्या खुलासामध्ये म्हटले आहे की, मौजे इंद्रायणीनगर सेक्टर क्रमांक १, प्लॉट क्रमांक ४ मधील पाण्याची उंच टाकी बांधण्याचे काम मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा. आयुक्त सो. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या समवेत विधानभवन, पुणे येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर तुर्तास सदर काम बंद ठेवण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार सध्यस्थितीत सदरचे काम बंद ठेवण्यात आलेले आहे. या पत्रावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांची स्वाक्षरी आहे.