मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाली. यावेळी ‘आमचा जर कोणी नाद केला तर सोडणार नाही. आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु. मात्र आम्हाला कोणी पाय लावण्याचा प्रयत्न केला, अंगावर आले तर शिंगावर घेऊ. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है, अशी प्रतिक्रीया शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. आमदार एकमेकांच्या अंगावर धावून आले. शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली आहे.
ते म्हणाले, गेली 3-4 दिवस आघाडीतले तिन्ही पक्षाचे नेते गद्दार, खोके अशाप्रकारे ओरडत होते. जे आम्ही केलेले नाही ते आमच्या माथ्यावरती मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवले की वस्तुस्थिती समोर आणावी. आणि त्याचमुळे आम्ही हे आंदोलन केले. ते जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा आम्ही आलो नाही. मग आमच्यावेळी ते का आले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, आता आम्ही आंदोलन केले तर ते त्यांना का मिर्च्या झोंबल्या? त्यांचे सगळे घोटाळे बाहेर काढले. कोरोनात झालेला भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा, अनिल देशमुखांपासून, नवाब मलिक, सचिन वझे, परब सर्वांचे घोटाळे बाहेर काढले. आमचे आंदोलन पूर्ण झाल्यावर त्यांनी यायला हवे होते. त्यांनी सगळ्यांचे लक्ष विचलित केले, हा कुठला प्रकार?