मुंबई ः सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी यूपीत हालविणार असल्याचे वक्तव्य केले होते. जाहीर केल्याप्रमाणे ते त्यासंदर्भात मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावरदेखील आले आहेत, अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी योगी आदित्यानाथ यांनी ठग म्हणून संबोधत विरोध दर्शविला आहे.
मुंबईतील ज्या हाॅटेलमध्ये योगी आदित्यनाथ उतरलेले आहेत. त्याच्यासमोरच मनसैनिकांनी विरोधाचे पोस्टर लावत निशाणा साधलेला आहे. ”कहा राजा भोज और कहा गंगू तेली… कुठे महाराष्ट्राचे वैभव आणि कुठे यूपीचं दारिद्र्य. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, यूपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपविण्यासाठी मुंबईतील उद्योग पळविण्यासाठी आलेला ‘ठग’,” अशा शब्दात टीका करत मनसैनिकांनी पोस्टक लावलेले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर पहिल्यांदा अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली आहे. तसेच आज दिवसभरात अनेक दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्याही भेटी घेणार आहेत.