पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आलं आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या क्षेत्रातील पर्यटन स्थळावर 144 कलम लागू केल्यामुळे पाच किंवा त्या पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते.
पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापर्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यातील पर्यटन स्थळावर जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी येत्या आठवड्यातही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पुणे जिल्ह्यात मागील आठवड्यातील नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात देखील पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहे. शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागू राहणार आहेत. तसेच पर्यटनस्थळं देखील बंद राहणार आहेत.
या पर्यटनस्थळांवर नियम लागू
1. मावळ तालुका
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉईंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदिर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, आंबेगाव येथील धबधबा, दुधीवरे येथील प्रति पंढरपूर मंदीर, बेंदेवाडी, दाहुली
2. मुळशी तालुका
लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पळशे धबधबा, पिंपरी दरी पॉइंट, सहारा मिटी, काळवण परिसर, ताम्हीणी घाट परिसर
3. हवेली तालुका
घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर
4. आंबेगाव तालुका
भिमाशंकर मंदीर परिसर, कोंडवळ धबधबा, डिंभे धरण, आहुपे पर्यटन स्थळ
5. जुन्नर तालुका
नाणेघाट, दारे घाट, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र, शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला
6. भोर तालुका
वरंडा घाट, रोहडेश्वर/विचित्र गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, नागेश्वर मंदीर, आंबवडे, भोर राजवाडा, नारायणपुर मंदीर परिसर, पाणवडी घाट, बोपदेव घाट, दिवेघाट, मल्हारगड
7. वेल्हा तालुका
तोरणा किल्ला, राजगड किल्ला, मढे घाट, पानशेत धरण, वरगाव धरण परिसर
खालील बाबींना प्रतिबंध असेल…
1. 5 किवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील
2. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे
3. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे
4. पावसामुळे धोकादयक झालेले ठिकाण, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे
5. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.
6. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे
7. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे.
8. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे.
9. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे
10. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डिजे सिस्टम वाजवणे, गाडीमधील स्पिकर उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे.
11. धबधब्याच्या 1 किलोमिटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आली आहेत.