पिंपरी : तुम्ही पोलिस खात्याचा पाया आहात. पाया भक्कम असेल तर इमारत सुस्थितीत उभी राहू शकते. त्यामुळे
तुमच्या अडचणी प्रथम सांगा अशा शब्दात पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तिसऱ्याच दिवशी शिंदे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्याला सकाळी नऊ वाजताच पोलिस ठाणे गाठले. कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी होताना स्वतः आयुक्त हजर असल्याने कर्मचारी अधिकारी ‘अलर्ट मोड’वर होते.
हिंजवडी पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत परिसर कोण कोणता येतो याचा आयुक्त शिंदे यांनी स्वतः फिरून आढावा घेतला. त्यानंतर हद्दीतील गुन्हेगार कोण, व्हाईट कॉलर गुन्हेगार कोण आणि या सगळ्यांवर आत्ता पर्यंत काय कारवाई केली याची माहिती स्वतः लिहून घेतली.
आयुक्त अचानक आल्याने काही वेळ कर्मचाऱ्यांची थोडी धावपळ उडाली होती. अनेक कर्मचारी पहाटे २ पर्यंत बंदोबस्तात होते. त्यामुळे त्यांना सकाळी पुन्हा कामावर येण्यास थोडा उशीर झाला होता. पण कोणतीही चिडचिड न करता, प्रॅक्टिकल तसेच फिल्ड वर्कची माहिती असल्याचे आयुक्त यांच्या साडे तीन तासांच्या सरप्राइज व्हिजिट वरून दिसून आल्याने निरीक्षण कर्मचाऱ्यांनी नोंदविले आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्यांशी आपुलकीने संवाद साधून, आयुक्त शिंदे यांनी दैनंदिन कामकाजातील अडचणी समजून घेतल्या. त्याच बरोबर लिहून घेतलेल्या समस्या सोडविण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल असे आश्वासन आयुक्त शिंदे यांनी दिले.