पिंपरी : महिलेबाबत चुकीचे वक्तव्य केल्याचा गैरसमज करुन करण्यात आलेली मारहाण आणि नाक घासायला लावले याचा अपमान सहन न झाल्याने तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना डुडुळगाव येथे रविवारी (दि. 17) सायंकाळी घडली.
सचिन सोपान तळेकर (29, रा. डुडुळगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मनोज दिगंबर ढोले (22, रा. डुडुळगाव) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरकिरण रामदास कान्हुरकर (34), विजय दत्तात्रय तापकीर (32), अमोर बाळासाहेब तापकीर (30, तिघेही रा. वडमुखवाडी, चऱ्होली) आणि अभिनव अर्जुन गायकवाड (18, रा. डुडुळगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सचिन हे महापालिकेच्या शाळेवर गेल्या दहा वर्षापासून सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. आरोपींच्या एका नातेवाईक महिलेस महापालिकेत कामाला लागायचे होते. याबाबतची कागदपत्रे महिलेने व्हॉटस् ऍपवर पाठविली. तसेच तिने फोन करून तीन ते चार जण येत असल्याचे सांगितले. मात्र सचिन यांनी मला फक्त तुम्हालाच भेटायचे आहे, असे म्हटले. याच वाक्याबाबत गैरसमज करून आरोपींनी आपसांत संगनमत करून सचिन यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. तसेच संबंधित महिलेची माफी मागण्यासाठी नाक घासायला लावले. हा अपमान सहन न झाल्याने सचिन तळेकर यांनी राहत्या घरात रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.