पिंपरी : चाकण महाळुंगे परिसरात भोसले वस्ती येथे मित्रांसोबत उभा असणाऱ्या तरुणावर चार चाकी गाडीतून आलेल्या तरुणांनी पिस्तूलातुन गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास घडली.
वैभव अरूण गायकवाड (21, रा. भोसले वस्ती, चाकण महाळुंगे) याच्यावर गोळीबार झाला. या प्रकरणी वैभव गायकवाड याने फिर्याद दिली आहे. तर महेश शिंदे, राहुल फलके, योगेश बोत्रे अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव गायकवाड हा घराच्या बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी गुन्हा दाखल असलेले महेश शिंदे आणि त्याचे साथीदार एका पांढऱ्या रंगाच्या कार मधून तेथे आले. त्यावेळी वैभव याचे मित्र दुचाकी घेऊन पळून गेले.
वैभव हा त्याचे कार काढून निघून जात असताना महेश शिंदे याने त्याच्या हातातील पिस्तुलातुन गोळीबार केला. तसेच त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले. तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.