मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी काही संपत नसल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर रोज नवनवीन आरोप होत आहे. नुकतच त्यांना फरार घोषित केलं होत. त्यानंतर आता त्यांच्यावर मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंग यांच्यावर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल फोन गायब केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांना शमशेर खान-पठाण यांनी पत्र लिहिले असून त्यात त्यांनी या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. या पत्रात असे म्हंटले आहे की, डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पीआय माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाईल फोन सापडल्याचे सांगितले होते, जो पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता. पण ज्या ठिकाणी कसाबला पकडले त्या गिरगाव चौपाटीच्या सिग्नलजवळ परमबीर सिंग आले होते. त्यांनी तो मोबाईल स्वतःकडे ठेवला. तपासी अधिकारी रमेश महाले यांच्याकडे तो मोबाईल तपासकामी द्यायला हवा होता पण त्यांनी तसे काही केले नाही. या मोबाईलवरुन हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हॅंडलरशी संवाद साधत होते. त्याफोनद्वारे पाकिस्तानी हँडलर आणि त्यात कोणी भारतीय आहे का, हे कळू समजू शकले असते, त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंग यांना अटकेपासून दिलासा दिल्यानंतर ते समोर येतील असे वाटत होते, पण ते काही आले नाहीत. त्यामुळे ते भारताबाहेर गेले असल्याचा आरोप करण्यात येत होता मात्र स्वतःच त्यांनी आपला ठावठिकाणा सांगितला आहे. आपण चंदिगढमध्ये असून तपासाला सहकार्य करण्यासाठी लवकरच मुंबईला जाऊ, अशी माहिती सिंग यांनी दिली आहे. दरम्यान, सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. मार्च महिन्यापासून ते कोठे आहेत हे कोणालाच माहित न्हवते. ते पळून गेल्याची चर्चाही सुरु झाली होती. सर्वोच्च न्यायालयानं सिंह यांच्या वकिलांनाही त्यांचा ठावठिकाणा विचारला. त्यावेळी वकिलांनी सिंग हे देशातच असल्याचे सांगितले होते.