हैदराबाद : आपण ‘एक भारत, श्रेष्ठ भारता’चे आपण ध्वजवाहक असून आपल्या प्रत्येक कृतीमधून ‘राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम’ ही भावना परावर्तीत झाली पाहीजे असा बहुमोल सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशिक्षणार्थ आयपीएस अधिकाऱ्यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थ आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, “येणाऱ्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातत्र्याची 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या 75 वर्षाच्या कालावधीत देशाने नेहमीच एक चांगली पोलीस व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस ट्रेनिंग ते पोलिसांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. भारतातील प्रत्येक क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होत असताना आपण करियर सुरु करत आहात. आपल्या करियरच्या भविष्यातील 25 वर्षे आणि भारताच्या विकासाच्या भविष्यातील 25 वर्षे ही अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे आपली मानसिकता नेहमी सकारात्मक असावी.”
कोरोना काळात पोलिसांना उत्तम काम केल्याच सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोरोना काळात पोलिसांनी देशवासियांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. या काळात अनेक पोलिसांना आपला प्राण गमवावा लागला. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो.”
देशात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये वाढ होत असून ते रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आर्थिक गुन्ह्यांनी आता गाव, जिल्हा आणि राज्यांच्या सीमा पार करुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आव्हान निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं.