तब्बल ३६३ कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त

दुबईतुन एका खास कंटेनरमध्ये लपवून आणले 'ड्रग्ज'

0

मुंबई :  दुबई येथून कंटेनरमध्ये लपवून आणण्यात आलेले तब्बल ३६३ कोटी रुपये किमतीचे (७२.५१८ किलो) हेरॉइन हे अमली पदार्थ पकडण्याची कामगिरी नवी मुंबई पोलिसांनी केली. यासाठी एक विशिष्ट प्रकारचा कंटनेर बनविण्यात आलेला होता. याचा गेली सात महिने कोणालाच लागला नव्हता.

न्हावा शेवा बंदरात परदेशातून आलेल्या एका कंटनेरमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना दिली होती. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी असा काही तपास केला की यामध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी अशी काही शल्लक लढवली जात आहे की याची पद्धत पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

मार्बल भरलेल्या कंटेनरच्या चारही बाजूंमध्ये हेरॉइन लपवून त्यावर वेल्डिंग करून ही तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे २७ डिसेंबर २०२१ रोजी हा कंटेनर पकडण्यात आला. पण त्यात पोलिसांना काहीही सापडलं नाही. अशात कंटेनर घेण्यासाठी कुणीही न आल्याने न्हावा शेवा बंदरातील कस्टम तसेच डीआरआय विभागाने या कंटेनरची तपासणी करून तो पनवेल येथील नवकार लॉजिस्टिक्स या गोडाऊनमध्ये ठेवला होता.  

यानंतर अखेर सात महिन्यानंतर या कंटेनरला थेट मॉडिफाय करून यात कशा प्रकारे हेरॉइन लपवलं होतं, याचा खुलासा करण्यात आला आहे. या कारवाईत अमली पदार्थांची तस्करी करणारे कुणीही पोलिसांच्या हाती लागले नसले तरी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली. 

पोलिसांनी कंटेनरमधील सर्व मार्बल बाहेर काढल्यानंतरही त्यात काहीही न सापडल्याने पोलिसांनी कंटनेर वाजवून पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा काही ठिकाणी मोठा आवाज तर काही ठिकाणी कमी आवाज येत असल्याचे आढळून आले. यानंतर कंटेनर बाहेरून वेगळा दिसत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. 

दरवाजाला असलेल्या फ्रेमची बारकाईने पाहणी केली असता फ्रेममध्ये अमली पदार्थ लपविले असल्याचा संशय आल्याने कंटेनरचा दरवाजा कटर मशिनच्या सहाय्याने कापण्यात आला. तेव्हा त्यात अमली पदार्थांची पाकिटे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी कंटनेरच्या बाजूचे पत्रे कापले असता, त्यात एकूण ७२ किलो ५१८ ग्रॅम हेरॉइन हे अमली पदार्थ सापडले.  

या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ३६२ कोटी ५९ लाख रुपये असल्याचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले.  हे अमली पदार्थ अफगाणिस्तानातून दुबईमार्गे आले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे. ‘एसआयटी’च्या माध्यमातून या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यात येईल, असा विश्वास पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.