मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालय आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा, मंदिरे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, केईएम रुग्णालय आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते तरी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे म्हणून मास्क घालणं गरजेचं आहे. मागील दोन तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता आहे.
कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाहीये. कोरोनाचा संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. पुढील महिन्यात शाळा सुरू होत आहेत. 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होतील. पालकांची संमती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत घेतलं जाईल. पालकांना विनंती आहे शाळा सुरू होत आहेत, तुमची परवानगी असेल तर प्रवेश मिळेल. या संदर्भात शाळा समिती कडे पालकांनी सम्पर्क करावा असंही महापौरांनी म्हटलं आहे.
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, ‘विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.