शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन करण्याचा केंद्राचा अनोखा फंडा
आयआरसीटीसीकडून मोदी व शीख संबंधाचे पुस्तक ईमेलद्वारे २ कोटी ग्राहकांना सेंड
नवी दिल्ली ः दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललेले आहे. केंद्राकडून कोणताही तोडगा काढला जात नाही आणि आंदोलन कायदा मागे घ्यावा, या भूमिकेवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत केंद्राने नरेंद्र मोदी आणि शिख समुदायांऱ्या संबंधाकडे लक्ष ओढण्याचा प्रयत्न केला आहे. आयआरसीटीसीकडून हे संबंध दाखविण्यासाठी जवळपास २ कोटी मेल ग्राहकांना पाठविण्यात आलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिखांसाठी घेतलेले १३ निर्णय सांगण्यात आले आहेत.
८ ते १२ डिसेंबर दरम्यान, हे ईमेल ग्राहकांना पाठविण्यात आलेले आहेत. जवळपास ४७ पानांची हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील एक पुस्तिकाच आयआरसीटीसीने ईमेल केलेली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शीख समुदायासोबत विशेष संबंध’, असे या पुस्तकाचे शिर्षक आहे. केंद्र सरकारबद्दल असलेले गैरसमज आणि कृषी कायद्यांबद्दल जागृती करण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे, असं सांगण्यात आलं आहे.
आयआरसीटीसीच्या ग्राहकांनीच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे, तर आयआरसीटीसीच्या आधिकाऱ्यांनी हे खोटं असल्याचे सांगितले आहे. फक्त शीख समाजालाच हे पुस्तक पाठविवेलेले नाही तर सर्व ग्राहकांना आम्ही ईमेल केलेले आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पुस्तकामध्ये करमुक्त लंगर, कर्तारपूर काॅरिडोर, जालियनवालाबाग स्मारक, १९८४ दंगलवीपीडितांना दिलेले न्याय, अशा एकूण १३ निर्णयांचा समावेश त्यात करण्यात आलेला आहे.