मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना

0

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा नियोजित दौरा नाही. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयातूनही मुख्यमंत्री अचानक दिल्लीला का गेले? हे सांगण्यात आलेलेल नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या तातडीच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना ऊत आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. परंतु या भेटीगाठीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून मुख्यमंत्री शिंदे वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे सरकारमध्ये अनपेक्षितपणे सामील झालेल्या अजित पवार गटामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. सत्तेत सहभागी होताच राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपददेखील मिळाले आहे. त्यामुळे वर्षभरापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांची चांगलीच निराशा झाली. त्यात आपल्या वाट्याची महत्त्वाची खाते सोडण्यास शिंदे गट आता तयार नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने त्याग करत आपल्या वाट्याची सहा खाती अजितदादा गटाला दिली होती. तर, शिंदे गटाने आपल्या वाट्याची केवळ दोन खाती सोडली होती. अजून 10 ते 12 विभागाचे खातेवाटप बाकी आहे. त्यामुळे पुढील विस्तार कधी होणार व त्यात कोणत्या नेत्यांना संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर काही चर्चा होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.