पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या समर्थकांचे शक्तीप्रदर्शन!

वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम : एकाच दिवशी सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘हेवीवेट’ नेते आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनसोडे शहराच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ ठरणार हे आता निश्चित झाले आहे.


ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शहरात आमदार बनसोडे यांचा वाढदिवस साजरा होत होता.
शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले बनसोडे आता सक्रीय झाले आहेत. पक्षातील एक विशिष्ट गट पक्षीय राजकारणात बनसोडे यांना ‘कॉर्नर’ करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामागे पिंपरी विधानसभा मतदार संघातील २०२४ च्या निवडणुकीची गणिते आहेत.

दरम्यान, आमदार बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांत मतदार संघातील प्रलंबित विकासकामांबाबत आणि प्रश्नांबत बैठका, पाठपुरावा याचा सपाटा लावला.
रेल्वे ट्रॅकशेजारील झोपडपट्टीधारकांपासून सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबाना घरे देण्यापर्यंत बनसोडे यांनी विविध मूलभूत प्रश्नांना हात घातला. बनसोडे यांची शहरात ‘क्रेझ’ वाढू लागली. त्यामुळेच  नवनिर्वाचित शहराध्यक्षांपासून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी झाडून वाढदिवस सोहळ्याला हजेरी लावली.

सिद्धार्थ बनसोडे यांचा सामाजिक वसा…
आमदार बनसोडे याचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांनी पुढाकार घेत शहरातील गोरगरिब नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवा देण्याबाबत संकल्प केला. त्यानुसार एकाच दिवशी सहा रुग्णवाहिका लोकार्पण करीत आपले वडील आमदार बनसोडे यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, आगामी महापालिका निवडणुकीत सिद्धार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरणार हेसुद्घा जवळपास निश्चित मानले जात आहे.

आमदार बनसोडे यांची राजकारणापलिकडील मैत्री…
आमदार बनसोडे यांचे अत्यंत जीवलग मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी बनसोडे यांनी यावर्षी आपला कोणताही मोठा कार्यक्रम न घेता अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आमदार बनसोडे आणि जगताप यांच्या राजकारणापलिकडील मैत्रीची चर्चा रंगली होती.

पक्षश्रेष्ठींकडून बनसोडे यांना ताकद मिळणार…
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा नव्या पिढीकडे असली, तरी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी अण्णा बनसोडे   यांना ताकद देणार आहेत. किंबहुना, राष्ट्रवादीची ती अपरिहार्यता आहे. कारण, नव्या- जुन्यांचा मेळ घालून स्थानिक राजकारणात निर्णायक बदल घडवणारा आश्वासक चेहरा सध्यस्थितीला राष्ट्रवादीकडे नाही. दुसरीकडे, पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, अशी राजकीय परिस्थिती आहे.  ही वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार लक्षात घेतील आणि आमदार बनसोडे यांना राजकीय ताकद मिळले, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.