पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच : निवडणूक आयोगाचा खुलासा

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, दुसरीकडे करोनाची रूग्णसंख्य हळूहळू वाढत असून ओमायक्रॉनचा धोका देखील वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. निवडणूक आयोग देखील या मागणीचा विचार करत असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगानं याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

देशभरातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबत घोषणा केली आहे. “सर्वच पक्षांनी निवडणुका नियोजित वेळेतच घेतल्या जाव्यात, अशी भूमिका मांडली आहे”, असं चंद्रा म्हणाले.

दरम्यान, निवडणुका आणि प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमावलीचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचं याआधी देखील दिसून आलं आहे. सध्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि ओमायक्रॉनचा प्रसार या गोष्टी पाहाता याविषयी आयोगाची काय भूमिका आहे, अशी विचारणा होताच सुशील चंद्रा यांनी त्यासंदर्भातील नियमावलीबाबत माहिती दिली. “निवडणूक काळात कोविड १९ शी संबंधित नियमावलीचं पालन केलं जाईल निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर त्यासोबत आम्ही यासंदर्भातली नियमावली देखील जाहीर करू”, असं चंद्रा म्हणाले.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी वाढवण्यात आल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं. “या निवडणुकांसाठी मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीमध्ये मतदान होईल”, असं सुशील चंद्रा यांनी जाहीर केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.