चुलत भावाचा खून करुन मृतदेह शेतात पुरला

0

पुणे : सहा महिन्यापासून बेपत्ता असणार्‍या तरुणाचा खून चुलत भावाने केला. मृतदेह उसाच्या शेतात पुरून ठेवला. पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला असून आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे 21 ऑगस्ट 2021 रोजी घडला.

सुजित संभाजी जगताप (32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ किशोर बाळासो जगताप (30) याला भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयत सूजित याचे वडील संभाजी जगताप यांनी 23 ऑगस्ट रोजी भिगवन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर जगताप याने घटनेच्या दिवशी सकाळी अकरा वाजता फोन करून सुजित जगताप त्याला शेतात बोलावले होते. मात्र संध्याकाळ झाली तरी सुजित घरी परतला नव्हता. त्यामुळे एक दिवस वाट पाहून त्याच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी सुजित बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक तपास करत किशोर जगताप याला ताब्यात घेतले होते.

सुरुवातीला किशोरने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सुजीत याला शेतात नेऊन खोऱ्याच्या लाकडी दांड्याने मारून त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून उसाच्या शेतात खड्डा खोदून त्यात पुरल याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीला अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.