ओमिक्रॉन व्हेरिएंट : कोविड प्रतिबंधक यंत्रणा सज्ज करण्याच्या राज्यांना सुचना

0

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील काही देशात पसरत असलेल्या कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकारची कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन बैठक झाली. केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवीन गाइडलाईन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत घ्यावयाची खबरदारी असलेले पत्र जारी केले.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर, विशेषतः ‘हाय रिस्क’ देशांतून येणा-या प्रवाशांची विमानतळआवर तपासणी करून त्यांचे अलगीकरण करण्यात यावे, नियमित तपासणी, कोविड चाचणी, त्यांच्या मागील प्रवासाच्या नोंदी आणि त्यांचे नमुने त्वरित जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवणे, अशा सुचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिल्या गेल्या आहेत.

कोविड चाचणी पायाभूत सुविधा वाढवण्याच्या सुचनाही केंद्र सरकारने या पत्रात केल्या आहेत. नवीन कोविड विषाणूची कोणतीही लाट उद्भवल्यास सुधारित चाचणी केंद्रे कार्यरत असावीत. काही राज्यांमध्ये RT-PCR चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. पुरेश चाचण्यांअभावी संसर्ग पसरण्याची खरी पातळी निश्चित करणे अत्यंत कठीण होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे, राज्यांनी चाचण्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

ज्या भागात अलीकडील पॉझिटिव्ह केसेस जास्त आहेत, त्या हॉटस्पॉट्सवर शासकीय यंत्रणांनी करडी नजर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे या पत्रात म्हटले आहे. सर्व हॉटस्पॉट्समध्ये, चाचण्या करून पॉजिटीव्ह नमुने संबंधीत जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत त्वरीत जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रयोगशाळा भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रच्या (NCDC) अंतर्गत आहेत.

कुठल्याही हॉटस्पॉट्सला लगेच कंटेनमेंट झोन म्हणून निर्धारित करण्याच्याही सुचनाही आहेत. त्याचबरोबर कोविड उपचारासाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा तयार कराव्यात, या सुविधा संपूर्ण राज्यात विखुरलेल्या हव्यात, एकाच विशिष्ट ठिकाणी केंद्रित केल्या जाऊ नयेत असेही या पत्रात म्हटले आहे.

सर्व राज्यांनी ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण’ (Test-Track-Treat -Vaccination) या तत्त्वाची आणि कोविड प्रोटोकॉलची कठोर अंमलबजावणी होत असल्याचे सुनिश्चित करावे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधात्मक उपाय करावे, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जवळपास सर्व राज्यांनीही नवीन कोविड प्रकाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.