धक्कादायक…अंधश्रद्धेतून अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीत अघोरी पूजा

0

सातारा: वाईतील सुरूर येथील स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीची अंधश्रद्धेतून अघोरी पूजा केल्याप्रकरणी २४ तासांच्या आत सहा संशयितांना पुण्यातील हडपसर येथून अटक करण्यात आल्याची माहिती भुईंज पोलिसांनी दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

राहुल राजेंद्र भोसले (वय २६), नितीन लक्ष्मण चांदणे (वय ३९), विशाल बाबासाहेब चोळसे (वय ३२), सुमन बाळासाहेब चोळसे (वय ५०), सुशीला नितीन चोळसे (वय ३५), केसर लक्ष्मण चांदणे (वय ५५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण पुणे हडपसर येथील बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर रामटेकडी भागातील रहिवासी आहेत. या सहा जणांना वाई न्यायालयात हजर केले असता ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सुरूर येथील स्मशानभूमीत मांत्रिकाने एका अल्पवयीन मुलीसोबत बाहेरची बाधा झाली आहे, असे सांगत अघोरी पद्धतीने पूजा केली होती. स्मशानभूमीत हळदी-कुंकवाचे गोलाकार रिंगण आखून त्याशेजारी अंडे, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवली गेली. अल्पवयीन मुलीस केस मोकळे सोडून बसवत पूजा केली गेली. तिच्या हातात कोंबडाही देण्यात आला होता. ही बाब स्थानिक तरुण व ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी या प्रकाराला अटकाव केला होता. त्यानंतर संबंधितांनी पळ काढला होता.

याप्रकरणी विवेक चव्हाण याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. या घटनेची जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी गांभीर्याने दखल घेत भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व त्यांच्या टीमला तपासाबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक निवास मोरे, तुकाराम पवार, प्रशांत शिंदे, रविराज वर्णेकर, प्रसाद दुदुस्कर आदींचे पथक हडपसर पुणे येथे गेले. भुईंज पोलिसांनी रात्री संबंधित महिला व पुरुषांसोबत त्या मुलीलाही ताब्यात घेतले होते. संबधित मुलीची चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली तर उर्वरित संशयितांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सदर मुलीची अघोरी पद्धतीने पूजा का करण्यात आली, याचे नेमके कारण आता अटकेतील आरोपींच्या तपासातून उघड होणार आहे. पोलीस सर्वांचा कसून तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.