आरोपींना पकडायला गेलेल्या पोलीस पथकावर गोळीबार; तिघांना अटक

पोलीस कर्मचारी जखमी; पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक

0

पिंपरी : सांगवी, पिंपळे गुरव मधील काटेपुरम चौकात भर दिवसा एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींना पकडायला गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलीस पथकावर आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या. तर स्वक्षणार्थ पोलिसांनाही आरोपींच्या दिशेने दोन राउंड फायरिंग केले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी रात्री आकाराच्या सुमारास चाकण येथील कुरवंडी गावच्या हद्दीत घडला. या कारवाई दरम्यान स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश उपस्थित होते.

पोलिसांनी गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, महेश तुकाराम माने या तिघांना अटक केली आहे. योगेश रवींद्र जगताप  (36, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, , निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी आपसात संगनमत करून कट रचला. परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश जगताप याच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या गुन्ह्यातील आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरवंडी येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर, सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील टोणपे, डीबीचे प्रमुख सहायक निरीक्षक सतीश कांबळे, गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने आणि त्यांचे पथक रवाना झाले.

पोलिसांना पाहताच मोटे आणि माने या दोन आरोपीनी त्यांच्याकडील पिस्तुलातुन पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलिसांनाही आरोपींच्या दिशेने फायरिंग केले. या सर्व थरारामध्ये अनेक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती पोलीस आयुक्तालयात आज सोमवारी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.