शहरात खुनाचे सत्र सुरुच; भोसरीत घरात घुसून महिलेचा खून

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील खुनाचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. यापूर्वी आठ दिवसात सात खून झाले असताना आणखी एक खून झाला आहे. एकट्या महिलेच्या घरात घुसून धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना शनिवारी (दि. 25) रात्री सव्वा नऊच्या सुमारास धावडेवस्ती, भोसरी येथे उघडकीस आली.

कलावती धोंडीबा सुरवार (38, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कलावती यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून त्या मुलासह धावडेवस्ती येथे राहत होत्या. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात इसमाने घरात घुसून धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा खून केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या महिन्यातील खुनाची ही दुसरी घटना आहे. दोन सप्टेंबर रोजी दापोडी येथे एका बंद इमारतीच्या समोर केअर टेकरचा खून झाला होता. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी खुनाची दुसरी घटना धावडे वस्ती येथे घडली आहे.

दहा दिवसांत आठ खून

पिंपरी चिंचवड शहरात मागील दहा दिवसांपासून खून सत्र सुरू आहे. मागील दहा दिवसांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आठ खून झाले. या आठ खुनांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

# 16 सप्टेंबर रोजी रावेत येथे सौंदव सोमरु उराव या सुरक्षा रक्षक महिलेचा खून झाला. तिने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार घडला. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी घोरावडेश्वर येथे एका नवविवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला.

# 20 सप्टेंबर रोजी दुसरी खुनाची घटना निगडी ओटास्किम येथे घडली. संपत गायकवाड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांचा सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून खून करण्यात आला.

# 21 सप्टेंबर रोजी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या. चिखली येथे वीरेंद्र उमरगी या व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरात खून करण्यात आला. तर त्याच दिवशी हिंजवडी जवळ सुस येथे एका सुरक्षा रक्षकाने त्याच्या सुरक्षा रक्षक मित्राला ठार मारले. मित्राने पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्याने हा खून झाला आहे.

# 22 सप्टेंबर रोजी रात्री रावेत येथे एक खुनाची घटना उघडकीस आली. खैरून बी या महिलेचा तिच्या राहत्या घरात पतीने वस्त्राच्या नाडीने गळा आवळून खून केला. कहर म्हणजे पती त्याच्या पोटच्या तीन मुलांना रस्त्यावर सोडून निघून गेला.

# 23 सप्टेंबर रोजी सकाळी डांगे चौक येथे रोशन कांबळे या व्यक्तीचा खून झाला. 25 सप्टेंबर रोजी धावडे वस्ती, भोसरी येथे एका महिलेचा खून झाला आहे.

शहरात गेली आठ दिवस सलग खुनाचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. याबाबत पोलीस आयुक्तांना विचारले असता शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित असून घरगुती वादातून असे प्रकार होत असल्याने आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.