श्रीलंकेत उठाव! नागरिकांचा राष्ट्रपती भवनावर ताबा, राष्ट्रपती पळाले!

कोलंबोत पंतप्रधानांचाही राजीनामा, आर्थिक संकटातील श्रीलंकेत आता काळजीवाहू सर्वपक्षीय सरकार

0

कोलंबो : आर्थिक संकटाला झुंजणार्‍या श्रीलंकेत अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून, संतप्त नागरिकांनी आज कोलंबोमध्ये राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर धडक देत राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला. नागरिकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी अटोकाट प्रयत्न केले. परंतु, आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले व जोरदार तोडफोड केली. नागरिकांचा उद्रेक पाहाता, राष्ट्रपतींनी तातडीने घर सोडून पळ काढला आहे. लष्कर, पोलिस व सुरक्षा दलाचे जवान आंदोलन दडपण्यासाठी आक्रम झाले. त्यांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली, गोळीबार, लाठीमारही केला. त्यात 100 नागरिक, पाेलिस व जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, राजपक्षे देश साेडून पळाले असून, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही राजीनामा दिल्याने, तेथे सर्वपक्षीय काळजीवाहू सरकार अस्तित्वात आले आहे.

जनतेने राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्यानंतर, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपत्कालिन बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्रिमंडळ व उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पंतप्रधानांनीही राजीनामा दिला असून, आता श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार अस्तित्वात आले आहेत. लवकरच सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

कोलंबोस्थित राष्ट्रपती भवनाला नागरिकांनी घेराव घातला असून, जोरदार तोडफोड केली आहे. प्रारंभी नागरिकांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या राजीनाम्यांची मागणी केली होती. त्यानंतर दुपारून अचानक राष्ट्रपती भवनावर धडक दिली. सुरक्षा दलांना हटवून आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले होते. त्यानंतर घाबरलेल्या राष्ट्रपती राजपक्षे यांनी कुटुंबासह सुरक्षा दलांच्या सहाय्याने घरातून पळ काढला. ते सुरक्षित असल्याचे लष्कराने सांगितले आहे.

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिस, सुरक्षा दलाचे जवानांनी पाण्याचे फवारे, अश्रुधुर, लाठीमार केला. हिंसक जमावावर गोळीबारही करण्यात आला आहे. या घडामोडीत 100 नागरिक आणि बरेच पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना कोलंबोतील राष्ट्रीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सद्या कोलंबोत प्रचंड तणाव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.