सातारा : पाटण तालुक्यातील आंबेघर, ढोकावळे व कोयना विभागातील मिरगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन जीवित व वित्तहानी झाली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी आज शोधकार्यात ‘एनडीआरएफ’ टीमला भूस्खलन झालेल्या आंबेघर येथे 15 पैकी 11 जणांचे मृतदेह मिळाले. तर ढोकावळेत चारपैकी दोन जणांचे मृतदेह मिळाले.
मिरगाव येथेही या दुर्घटनेत 12 जण बेपत्ता होते. त्यापैकी सहा जणांचे मृतदेह आढळले. एक जखमी अवस्थेत आढळला. त्यामुळे शनिवारी ‘एनडीआरएफ’च्या टीमला एकूण 19 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अद्यापही सोळा जण बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरू आहे.
आंबेघर गावच्या वरच्या बाजूस असणारा डोंगर कोसळल्याने गावातील दहापैकी चार कुटुंबे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. यामध्ये सुमारे 14 जण बेपत्ता होते. मिरगावमध्ये 12 बेपत्ता होते. ढोकावळे येथे चार जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी शुक्रवारी एक व शनिवारी एक असे दोन मृतदेह आढळून आले. दोन जणांचा शोध सुरू आहे. याठिकाणीही ‘एनडीआरएफ’ची टीम दाखल झाली असून शोध कार्य सुरू आहे.
आंबेघर येथे आज अथक परिश्रम करून ‘एनडीआरएफ’ची टीम सकाळी 11 वाजता गावात दाखल झाली. तोपर्यंत काही स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी शोधकार्य सुरू केले होते.
‘एनडीआरएफ’ची टीम दाखल झाली व शोध कार्यासाठी गती मिळाली. अख्खा डोंगर गावावर कोसळल्याने मातीचा ढिगारा 10 ते 15 फूट होता. काही घरे संपूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. त्यामुळे तेथे मदतकार्यात अडथळे आले.